आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा उद्देश गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दर्जेदार आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे.
महाराष्ट्रात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या राज्ययोजनेसह एकत्रितपणे राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ देशातील सर्व सरकारी तसेच योजनेस संलग्न खाजगी रुग्णालयांत मिळतो.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत एका कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य उपचारांचा विनामूल्य लाभ मिळतो. रुग्णालयात दाखल होण्यापासून ते सुटकेपर्यंतचा सर्व खर्च योजनेद्वारे भागविला जातो. महाराष्ट्रातील नागरिकांना ही सुविधा राज्यातील तसेच देशातील इतर राज्यांमध्ये देखील मिळू शकते, कारण आयुष्मान भारत योजना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाशी संलग्न आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १,५०० पेक्षा अधिक आजारांवर उपचार उपलब्ध आहेत, ज्यामध्ये शस्त्रक्रिया, हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंडाशी संबंधित उपचार आदींसाठी लाभ मिळतो .
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्रता निकष
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रामुख्याने सामाजिक-आर्थिक जनगणना (SECC) मध्ये समाविष्ट असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कुटुंबांसाठी आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन मजूर, शहरी भागातील गरीब कुटुंबे तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील पात्र लाभार्थी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा फायदा घेऊ शकतात. पात्रतेबाबत शंका असल्यास नागरिक beneficiary.nha.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले नाव शोधून पाहू शकतात. तसेच १२ अंकी राशन कार्ड आयडी वापरून rcmc.mahafood.gov.in या संकेतस्थळावर पडताळणी करता येते .
आयुष्मान कार्ड आणि ई-केवायसी प्रक्रिया
आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. कार्ड बनवण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून कोणतेही पैसे घेतले जात नाही. लाभार्थी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामधील आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायतमधील आपले सरकार केंद्र चालविणारे अधिकारी, कॉमन सर्विस सेंटर (CSC) किंवा स्वस्त धान्य दुकानांकडे जाऊन आयुष्मान कार्डसाठी ई-केवायसी करून घेऊ शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा ?
केंद्रेलाभार्थी स्वतः बेनिफिशिअरी लॉगिनद्वारेही आपले कार्ड तयार करू शकतात. यासाठी Google Play Store वरून “Ayushman App – National Health Authority” हे अॅप डाउनलोड करून त्यात लॉग इन करावे लागते. प्रक्रियेची सविस्तर माहिती योजनेच्या अधिकृत YouTube चॅनेलवर उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रे’, CSC केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने व आरोग्य केंद्रांची यादी उपलब्ध आहे, जिथे लाभार्थी आपले कार्ड बनवू शकतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही शहरी, ग्रामीण व तालुका स्तरावर अशी केंद्रे कार्यरत आहेत .
आयुष्मान भारत योजनेशी संलग्न असलेली अनेक सरकारी तसेच खाजगी रुग्णालये लाभार्थ्यांना उपचार सुविधा पुरवतात. या रुग्णालयांमध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णाला कोणतेही रुग्णालय शुल्क भरावे लागत नाही. सर्व वैद्यकीय खर्च केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य खात्यांमार्फत भागविला जातो. रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीची ओळख आयुष्मान कार्डद्वारे केली जाते आणि उपचार खर्च थेट योजनेंतर्गत मंजूर केला जातो.
आयुष्मान कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड व राशन कार्ड आवश्यक आहे.कार्ड ई-केवायसीसाठी आधारला जोडलेला मोबाईल क्रमांक चालू असावा.कोणत्याही व्यक्तीकडून या प्रक्रियेसाठी पैसे घेतले जाणार नाही.अधिकृत माहिती फक्त chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in आणि mhafood.gov.in या सरकारच्या संकेतस्थळांवरच पाहावी.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य संरक्षण योजना असून समाजातील दुर्बल घटकांना वैद्यकीय खर्चाची चिंता न करता उपचार घेण्याची संधी प्रदान करते. महाराष्ट्रातील रहिवाशांनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपले आयुष्मान कार्ड तयार ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून आवश्यकतेच्या वेळी कोणताही उशीर न करता मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळू शकेल .