महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन साध्य करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. ही योजना खरंतर 21 ते 65 वर्षे वयोगटातील राज्यातील गरजू, गरीब आणि आवश्यक महिलांसाठी असून त्यांना दर महिन्याला आर्थिक साहाय्य थेट बँक खात्यात मिळते.
माझी लाडकी बहिण योजनेचा उद्देश
माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि असहाय महिलांच्या जीवनात अर्थसहाय्य निर्माण करण्यासाठी राबवली गेली आहे. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे आणि घरातील आर्थिक खर्चात मोठी भूमिका बजावता यावी हा सरकारचा प्रमुख हेतू आहे.
माझी लाडकी बहिण योजनेतून मीळणारे लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मिळणार असून लवकरच हा लाभ २,१०० रुपये केला जाणार आहे.म्हणजेच वार्षिक एकूण १८,००० रुपये थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात.काही अपडेट्सनुसार, वर्षातून ३ मोफत गॅस सिलेंडर्स मिळू शकतात.ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यास Nari Shakti Doot अॅप किंवा अधिकृत पोर्टलवर (ladakibahin.maharashtra.gov.in) सुविधा उपलब्ध आहे.
योजनेसाठी पात्र होण्यासाठी निकष काय आहे?
माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तर अटी खूपच सोप्या आहेत.
- अर्जदार महिला असावी.
- अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावी.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- महिलेचे आधारशी संलग्न बँक खाते असावे.
- विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त, निराधार आणि कुटुंबातील अविवाहित महिला अर्ज करू शकतात.
- अर्जदार, तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य, नियमित सरकारी कर्मचारी/आयकरदाता/पेन्शनधारक नसावा.
- इतर योजनांमधून आधीच ₹1,500 किंवा अधिक मासिक लाभ घेणाऱ्या महिला अपात्र आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने ऑनलाईन अर्जाची खास व्यवस्था करून दिली आहे. यासाठी तुम्ही थेट ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊ शकता किंवा मोबाईलवर उपलब्ध असलेल्या Nari Shakti Doot या अॅपच्या मदतीनेही नोंदणी सहज करू शकता.
नोंदणी करताना काही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे. त्यात तुमचे आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुकची प्रत, उत्पन्न प्रमाणपत्र आणि हमीपत्र यांचा समावेश होतो. ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करावी लागतात.
फॉर्म भरताना मात्र विशेष काळजी घ्यावी. अर्जामध्ये लिहिलेली प्रत्येक माहिती तुमच्या आधारकार्डवरील तपशीलाशी जुळणारी आणि बरोबर असावी. चुकीची माहिती भरल्यास अर्जात अडचणी येऊ शकतात.त्यामुळे माहिती भरताना नीट तपासून मगच सबमिट करणे महत्त्वाचे आहे.
ही प्रक्रिया जरी ऑनलाइन असली तरी ती अगदी सोपी आहे. थोडं संयम ठेवलं, कागदपत्रे नीट स्कॅन केली आणि माहिती अचूक भरली, तर प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ घेणे अगदी सहज शक्य आहे.
ऑफलाइन अर्ज कुठे करता येईल?
अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, आशा सेविका, बालवाडी सेविका आदींकडे अर्ज करता येईल.अर्ज करताना महिला स्वतः उपस्थित राहून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे.
योजनेसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात?
- आधारकार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा राशनकार्ड (पिवळे/केशरी)
- अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- हमीपत्र
माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी अधिकृत पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in किंवा Nari Shakti Doot अॅपवर भेट द्यावी. शासकीय सेतू केंद्र, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीनेही अर्ज करता येतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशी सरकारी मदत योजना आहे. आर्थिक सक्षमीकरण, सुरक्षितता आणि सन्मानासाठी राज्य सरकारचा ठाम पुढाकार या माध्यमातून दिसतो. पात्र महिलांनी वेळेत अर्ज भरावा आणि शासकीय पोर्टल/सेवा केंद्रावर अधिक माहिती मिळवावी.